मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) ६३ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संचालक (संचलन) (प्र.) श्री. संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) श्री. नसीर कादरी, संचालक (वित्त) श्री. अशोक फळणीकर, संचालक (मा.सं.) श्री. सुगत गमरे, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. सुधीर वानखेडे, मुख्य अभियंता श्रीमती जुईली वाघ, श्री. सुनील सूर्यवंशी, श्री. भूषण बल्लाळ, श्री. पीयूष शर्मा, उपमहाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. नितीन कांबळे, श्री. अभय रोही, उपमुख्य सुरक्षा अधिकारी श्री. राजेश गोवळकर, उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. प्रशांत गोरडे, शिष्टाचार अधिकारी श्री. सतिश जाधव यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासकीय परिपत्रकाच्या पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते महापारेषणच्या प्रशासकीय परिपत्रकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) म्हणाले, “मानव संसाधन विभाग सातत्याने मेहनत घेत आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या पुस्तकामुळे प्रशासकीय कामांमध्ये स्पष्टता येणार आहे. कंपनीतील अन्य विभागांनीही पुढाकार घेऊन मानव संसाधन विभागांप्रमाणे नावीन्यपूर्ण काम करावे. तसेच प्रत्येक विभागाने पुस्तकरूपाने एकत्रित असे सादरीकरण करावे.“
महापारेषणचे संचालक (मा.सं.) श्री. सुगत गमरे म्हणाले, “प्रशासकीय परिपत्रकाचे एकत्रित असे हे पुस्तक आहे. या पुस्तकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामांमध्ये सुसुत्रता व सुलभता येईल. संदर्भ म्हणून हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. ५०१ ते ६०१ अशा एकूण १०० प्रशासकीय परिपत्रकाचे मिळून हे पुस्तक बनले आहे. मानव संसाधन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम सांघिक भावनेने केले आहे.“
मानव संसाधन विभाग अग्रेसर
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली महापारेषणचे संचालक (मा.सं.) श्री. सुगत गमरे यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले आहेत. यापूर्वी वातानुकूलित लायब्ररी व व्यायामशाळा (जिम) सुरू करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत.