मुंबई: वारीतील भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्या- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे. कोविडनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. वारीमध्ये महिला भाविकांची संख्या जास्त असल्याने त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य द्यावे. यावर्षी सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या पंढरीची वारी ॲपमधून वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा मिळतील याला प्राधान्य देण्याच्या सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवरील वज्रलेपाची झीज होणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाचा आराखडा, भक्त निवास आणि पंढरपूर शहराची स्वच्छता व नगरपालिकाबाबतचे प्रश्न चर्चिले गेले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, औरंगाबादच्या पुरातत्व विभागाचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोलापूरचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सोलापूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव, पंढरपूर देवस्थान समितीचे प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
‘पंढरीची वारी’ ॲपची महत्त्वपूर्ण भूमिका
पंढरीची वारी हे जिल्हा प्रशासनामार्फत वारीबाबत माहिती देणारे ॲप महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड संदर्भातील नियम पाळण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापनाला महत्त्व देताना यावर्षीच्या वारीमध्ये आरोग्य दूत नेमण्यात आले आहेत. महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद अशा तीनही यंत्रणाचे नोडल अधिकारी नेमण्यात आले असल्याने वारीला येणाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यास मदत होईल. वारी काळात मंदिर परिसरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे निगराणी, गर्दीचे व्यवस्थापन अचूक होण्यासाठी विशेष गणवेश असलेले अधिकारी यामुळे या काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन विधानपरिषदेच्या सभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले. वारी दरम्यान येथील स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन केंद्रावरील कचरा उचलणे, निर्माल्य वेळोवेळी उचलले जाईल याची सुद्धा काळजी घेण्यात यावी.
गर्दीचे नियोजन करा, सेवकांनी भाविकांशी संयमाने वागावे
दोन वर्षांनतर वारी होत असल्याने यावर्षी गर्दी लक्षात घेऊन त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. याशिवाय या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांशी तेथे नियुक्त सेवकांनी सौजन्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असून याबाबत जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोविडचे संकट अद्याप संपले नसून मंदिरात भाविकांची खूप गर्दी होणार नाही, आणि महिला भाविकांशी कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी आवश्यक ते सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
रुक्मिणी मंदिरात एक्झॉट पंखे तातडीने लावण्यात यावे
विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेप लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आता 9 आणि 10 जुलै रोजी विठ्ठल रुक्मिीणी मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार असल्याने तातडीने रुक्मिणी मंदिरात एक्झॉट पंखे तातडीने लावण्यात यावे. वारीसाठी मंदिर आणि परिसरात गर्दी होत असल्याने मूर्तीची काळजीही घेण्यात यावी. अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
पुरातत्व विभागाने दिलेला कालबद्ध आराखड्याची अंमलबजावणी करण्यात यावी
मंदिर आणि मंदिर परिसरात आवश्यक असणारी कामे करीत असताना या मंदिराचे पावित्र्य राखले जाण्यासाठी पुरातत्व विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन समिती यांनी सहकार्य करत सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक असणारी सर्व कार्यवाही करावी. सध्या पावसाळा सुरु असल्याने पावसाळ्यात कोणती कामे करता येतील याचे नियोजन करावे आणि पावसाळ्यानंतर दीर्घकालीन कामांचे नियोजन करुन कामे पूर्ण करण्यात यावीत.
तातडीची मदत पोहोचवा
या वारीसाठी आलेल्या भाविकांपैकी 16 वारकऱ्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यापैकी 2 वारकऱ्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या दोन वारकऱ्यांची पूर्ण काळजी घेऊन त्यांच्या उपचारांचा खर्च जिल्हा प्रशासन आणि सेवाभावी संस्थामार्फत करण्यावर भर द्यावा. तसेच उर्वरित सर्व वारकऱ्यांची काळजी घेत असताना या वारकऱ्यांवर मोफत उपचार करावेत, अशा सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, गॅस उपलब्ध करुन देण्याबरोबरच ठिकठिकाणी तात्पुरते शौचालय उभे करुन देण्यात यावेत. महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, वेन्डिंग मशीन उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच वारीदरम्यान ठिकठिकाणी कचरा आणि मैला उचलून नेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. याशिवाय एसटी स्थानकांच्या बाहेरदेखील तात्पुरते शौचालय उभारण्यात यावेत. नदीपात्रातील वाळूचा उपसा होत असल्याने काही ठिकाणी खड्डे पडले असून हे खड्डे तातडीने भरण्यात यावेत.
भक्त निवासचे काम तातडीने पूर्ण करा
सोलापूर येथील भक्त निवासचे तळमजला आणि बेसमेंटचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करावे. तसेच अंदाजपत्रक तयार करण्याबरोबच या संदर्भातील अहवाल विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही तातडीने करावी जेणेकरुन हे काम लवकर पूर्ण होईल, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.