मुंबई:- समृद्धी महामार्गाचा गोंदिया, गडचिरोलीपर्यंत विस्तार; सविस्तर प्रकल्प अहवालासाठी निविदा आमंत्रित. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया, गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर ते मुंबई दरम्यान ७०१ किलोमीटर लांबीच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे १६ बांधकाम पॅकेज अंतर्गत काम प्रगतीपथावर आहे. निविदा कालावधीनुसार हा महामार्ग सप्टेंबर २०२२ पर्यंत जनतेसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
गोंदिया, गडचिरोली या आदिवासी तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या विकासासाठी या भागात दळणवळण अधिक गतिमान झाले पाहिजे यासाठी समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदियापर्यंत तसेच नागपूरपासून गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे, सोबतच गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांनादेखील या महामार्गाने आपापसात जोडण्याचा प्रस्ताव असून विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यात सुसाध्यता व व्यवहार्यता अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि निविदापूर्व कामांचा समावेश आहे. नागपूर ते गोंदिया, गोंदिया ते गडचिरोली आणि गडचिरोली ते नागपूर या कामांचा या निविदेमध्ये समावेश असून या तीनही महामार्गांची सरासरी लांबी अंदाजे दीडशे किलो मीटर असल्याचेही मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.