राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कर्तव्यपथ उपक्रम

0

मुंबई: राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कर्तव्यपथ उपक्रम. राज्यात दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कर्तव्यपथ’ या उपक्रमांत राज्याच्या समाज कल्याण विभागाने लक्षणीय कामगिरी केली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यात समाज कल्याण विभागाने 6 हजाराहून अधिक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून 5 लाखांहून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला तर त्यातील 3 लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी समाज कल्याण विभागाने राबवलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले असून विभागाचे प्रयत्न निश्चितच भूषणावह असल्याचे सांगितले.

मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांच्या हस्ते नुकतेच मंत्रालयात समाजकल्याण विभागाच्या सेवा पंधरवडा उपक्रमांच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी समाजकल्याण विभागाच्या उपक्रमांबद्दल कौतुकोद्गार काढले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव ( वित्त व सुधारणा) राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अवर सचिव अनिल अहिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत राज्यात 519 ठिकाणी आयोजित जात वैधता प्रमाणपत्र जनजागृती शिबिरात 1600 महाविद्यालयातील 79 हजार पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात 17 हजार 282 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तर 17 हजार विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी 45 ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली. यात 464 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. जेष्ठ नागरिकांसाठी 311 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये 19 हजार 681 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी राज्यात 314 ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती त्यातून 91 हजार 824 जणांना वैश्विक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यातील 16 हजार 848 ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा या ठिकाणी 1 हजार 707 विविध कार्यक्रमांचे/स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 84 हजार 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमाच्या कालावधीत विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी 385 वसतिगृहात जाऊन 31 हजार 410 विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय, विविध महाविद्यालयात 2 हजार 776 समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले असून 36 हजार 173 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या माध्यमातून विशेष मोहिमेंतर्गत 1 लाख 73 हजार 654 विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यात आले. स्टँड अप योजनेतील 21 नवउद्योजकांचे प्रस्ताव या कालावधीत विभागाकडे प्राप्त झाले. नशा मुक्त अभियान अंतर्गत राज्यात 224 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित जातीच्या 265 वस्त्यांमध्ये जाऊन आदर्श वस्त्या निर्माण करण्यात येत आहेत.

या उपक्रमात कार्यालयीन बाबींकडेही विशेष लक्ष देण्यात आले. विभागातील 189 कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात आले तर 14 हजार 553 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. विविध कार्यालयातील 10 हजाराहून अधिक अभिलेखे अद्यावत करण्यात आले तर 372 कर्मचाऱ्यांना स्थायीत्व प्रमाणपत्र देण्यात आले. बाराशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल अद्यावत करण्यात आले असल्याची माहिती यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी दिली.

“सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाने राज्यात राबविलेले विविध उपक्रम यशस्वी ठरले आहेत,त्यासाठी राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रम आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत, त्यामुळे राज्यात समाज कल्याण विभागाची कामगिरी लक्षणीय ठरली आहे व जनतेलाही याचा मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे.” :- डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech