राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

0
मुंबई, दि १३: राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ‘ सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.  एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे,  त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.’

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech