पायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

 

मुंबई : पायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे- आरोग्यमंत्री राजेश टोपे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य विभागाच्या सचिव श्रीमती केरेकट्टा उपस्थित होत्या.

महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहीले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी जपान सरकारच्या ‘जायका’ संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रोसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी ‘जायका’कडून अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्प‍िटल उभारणीसाठी देखील जायकाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कर्करोग उपचारासाठी रेडीएशन थेरपी उपचाराकरीता यंत्रणा उभारणीसाठी जपानकडून तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरीता सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या भेटी दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमधील परिस्थिती, लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन, आरोग्य सुविधा याबाबत माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी जपानच्या वाणिज्यदूतांना दिली.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech