नागपूर: पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवण्याबाबत निश्चित धोरण तयार करणार – शंभूराज देसाई राज्यात मंडल स्तरावर असलेली पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवण्याबाबत काय धोरण असावे याबाबत निश्चितपणे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. तसेच शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी गावपातळीवर समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.
मंत्री श्री.देसाई म्हणाले की, अतिवृष्टीच्या निकषात न बसणारे परंतु सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत केली. यापुढे सततच्या पावसाचे निकष ठरवण्यासाठी प्रधान सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येताच याबाबत निश्चित धोरण तयार करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.
शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी समुपदेशन केंद्र गावपातळीवर सुर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. या महिलांना शेतकरी गट आणि महिला बचत गटाशी जोडून काय लाभ देता येईल, याचाही विचार केला जाईल. याबाबत लवकरच बैठक आयोजित करून निश्चित धोरण तयार करण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मदतीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवली जाईल. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसेल तर त्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य डॉ. राहुल पाटील, भास्कर जाधव, यशोमती ठाकूर, डॉ.देवराव होळी, संजय गायकवाड आदींनी सहभाग घेतला.