मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

0

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (10 जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चाही केली. “पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,”अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा झाली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.

मंदिर समितीच्यावतीने श्री. औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कारही केला.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech