मुंबई: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप साठी अर्ज करण्यास सहाव्यांदा मुदतवाढअनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास यावर्षीच्या प्रक्रियेत सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
महाडीबीटी पोर्टलद्वारे या दोनही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता केंद्रशासनाने अंतिम मुदत दिली होती, मात्र राज्य शासनाने काही अभ्यासक्रमांसाठीचे अंतिम प्रवेश अजूनही सुरू असल्याने विशेष प्रयत्नातून 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यावर्षीच्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत 5 वेळा मुदत वाढ देण्यात आली असून ही सहावी वेळ आहे. या योजनांशी संबंधित विद्यार्थी व पालकांनी 28 फेब्रुवारीच्या आत महाडीबीटी पोर्टलद्वारे आपले अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.