मुंबई: ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्या माध्यमातून मुंबई अधिक सुंदर बनवू – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा.‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून मुंबई अधिक सुंदर करुया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे व एच ईस्ट वॉर्ड येथे ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान शुभारंभप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आज पासून एक महिनाभर आपण हे अभियान राबवत आहोत. स्वच्छता ही सवय आहे, ती फक्त एक किंवा दोन दिवसांकरिता नाही तर रोजच आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रोगराई होऊ नये, यासाठी आपला परिसर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.
पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, पंधरा वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करू या. प्रत्येकाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवारी श्रमदान करा आपला परिसर, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.
यावेळी सर्वांनी मिळून स्वच्छतेची शपथ घेतली. एच ईस्ट वॉर्ड येथे आमदार पराग अळवणी, वांद्रे येथे मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे व अन्य शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.