महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या-मुख्यमंत्री

0

मुंबई:  महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या-मुख्यमंत्री. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत: ही दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज सागरी किनारा मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावाही घेतला.

यावेळी मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल (दूरदृष्यप्रणाली द्वारे) यांच्यासह इतर मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

सागरी किनारा मार्गाचे ५२ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम सुरु आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत म्हणजे नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती श्री. चहल यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांनी संकल्पकक्षातून आढावा घेण्यात येत असलेल्या योजनांची तसेच कामांची माहिती यावेळी घेतली. यावर्षी शासनाने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री जाहीर केली आहे. यातील महत्वाच्या विषयांचा, कामांचा पाठपुरावाही संकल्प कक्षामार्फत घेतला जावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

      मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या दृष्टीने अनेक प्रकल्प महत्वाचे आहेत. यापैकी काही योजना तसेच प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही कामं प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांसह आपण संकल्पित केलेले विविध प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावेत यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या टेलिमेडिसीन सुविधेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे काम महत्वपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. राज्य शासनाच्या आतापर्यंतच्या तीनही अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या योजना तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन कोणत्या योजना पूर्ण झाल्या, कोणत्या मागे राहिल्या आहेत याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech