मुंबई: महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. वस्तू आणि सेवा कर विभाग हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारे महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन झाले.
यावेळी नगर विकासमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) श्री. एकनाथ शिंदे, दूरदृष्यप्रणालीद्वारे तर वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री, मुंबई शहर श्री. अस्लम शेख, खासदार श्री. राहुल रमेश शेवाळे, आमदार श्री. कॅ. आर. तमिळ सेल्वन, मुख्य सचिव, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, सीजीएसटीचे मुख्य आयुक्त अशोक कुमार मेहता तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आजच्या वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार तसेच विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच सगळ्या परवानग्या मिळवून आज त्याचे काम सुरु होत आहे. इमारतीचे संकल्पचित्र अप्रतिम आहे. कोणतेही संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत ‘अर्थबळ’ लागते ते वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून मिळत असल्याने राज्य अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा विभाग भक्कम झालाच पाहिजे. कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब अभिमानास्पद आहे. आज भूमिपूजन होत असलेली वास्तू पर्यावरणपूरक असून ती २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल असेही श्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, वस्तू आणि सेवा कर विभागाची ही इमारत इतकी देखणी व्हावी की ती पाहण्यासाठी नागरिकांनी येथे यावे, देशातील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतींमध्ये ती सर्वोत्कृष्ट ठरावी.
जो करदाता येथे कर भरण्यासाठी येईल त्याला आपण भरलेला कर राज्य विकासाच्या कामात योग्य पद्धतीने वापरला जात असल्याची खात्री मिळेल अशी ही इमारत असावी अशी अपेक्षाही श्री ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिला. तसेच प्रशिक्षणाबरोबरच कर्मचाऱ्यांनी येथे येणाऱ्या करदात्याशी, सर्वसामान्य माणसाशी सन्मानपूर्वक वागावे, तो येथून परत जातांना आनंदाने आणि समाधानाने गेला पाहिजे असे आवाहनही श्री ठाकरे यांनी केले.