लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळाचे पुनर्गठन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

0

 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण व यशस्वी पाठपुराव्याने पुनर्गठन करण्यात आले आहे.

या सल्लागार समितीमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्यासह शिक्षण तज्ज्ञ डॉ.प्रभाकर कराड, कायदा तज्ज्ञ ॲड.संजय काळबांडे, शिक्षण तज्ज्ञ प्रा.वसंत सानप, समाजशास्त्र अभ्यासिका डॉ.स्मिता अवचार, उद्योजक सुनील किर्दक, अर्थतज्ज्ञ डॉ.आर.एस. सोळंके, कृषितज्ज्ञ निवृत्त भा.प्र.से. डॉ.भास्कर मुंडे, समाजशास्त्र अभ्यासक डॉ.भारत खैरनार व अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र काळे यांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेस लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या नावाने स्वतंत्र पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वायत्त बहाल करण्यात आले असून याबाबतचा शासननिर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे. या पदवी व पदविका संस्था व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे या निर्णयात म्हटले आहे.

सल्लागार मंडळास आवश्यक असणारा निधी, त्याचे स्वतंत्र लेखापरीक्षण तसेच फेलो, सिनिअर फेलो अशा विविध पदांची व कंत्राटी पदांची भरती करण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे.

ग्रामीण कौशल्य विकास, शेतीआधारीत विशेष शिक्षण आदी महत्वाच्या विषयांशी संलग्न असलेली ही संस्था मागील अनेक वर्षांमध्ये केवळ घोषणा व कागद इतकीच मर्यादित राहिली होती, परंतु धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळास व संस्थेस मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. श्री.मुंडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech