मुंबई: गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा परिणामी नवीन वीजजोडण्यांची मंदावलेली गती यावर महावितरणने धडक निर्णय घेत यशस्वी मात केली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये सिंगल व थ्रीफेजचे तब्बल १५ लाख ७६ हजार नवीन मीटर मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर उच्च व लघुदाबाच्या ५ लाख १८ हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी, मार्च २०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरचा लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे वीजमीटर उपलब्धता कमी होत गेली. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग काहीसा मंदावला होता. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी त्यावेळी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत वीजमीटरचा तुटवडा संपविण्याचे व नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्याचे आदेश दिले होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनीही क्षेत्रीय कार्यालयांना वर्षभर मुबलक व सातत्याने वीजमीटर उपलब्ध होईल यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा धडक निर्णय घेतला. त्याप्रमाणेनिविदाअंतर्गत पुरवठादारांना गेल्या मार्च महिन्यापासून सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
या धडक उपाययोजनेमुळे कोरोना काळातील वीजमीटरचा तुटवडा गेल्या पाच महिन्यांपासून संपुष्टात आला आहे. सोबतच उच्च व लघुदाबाच्या नवीन वीजजोडण्यांचा वेगही वाढला आहे. गेल्या मार्च २०२१पासून पुरवठादारांकडून नवीन वीजमीटर उपलब्ध होण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार तर थ्री फेजचे १ लाख १० हजार नवीन मीटर मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. यामध्ये (कंसात थ्री फेज) पुणे प्रादेशिक कार्यालय- सिंगल फेज ४ लाख ६२ हजार (३९,१०३), कोकण- सिंगल फेज ५ लाख ४५ हजार (३७,७८७), नागपूर- २ लाख ९५ हजार (२२,८६०) आणि औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे १ लाख ६४ हजार व थ्री फेजचे १०,२५० नवीन वीजमीटर पाठविण्यात आलेले आहेत. संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी देखील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेनेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिले.
वीजमीटर उपलब्ध झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास मोठा वेग देण्यात आला आहे. वर्षभरात महावितरणकडून साधारणतः ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र गेल्या मार्च ते जुलै २०२१च्या कालावधीत उच्चदाबाच्या ४३५ आणि लघुदाबाच्या ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात केली आहे. लघु व उच्चदाब वर्गवारीमध्ये सर्वाधिक घरगुती- ३ लाख ८९ हजार ४७, वाणिज्यिक- ५९ हजार ९६९, औद्योगिक- १० हजार ९६३, कृषी- ५० हजार १७८, पाणीपुरवठा व पथदिवे- ७४२ व इतर ७२४३ अशा एकूण ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यासोबतच ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा तपासणीमध्ये सदोष आढळून आलेले वीजमीटर देखील तातडीने बदलण्याची कार्यवाही सुरु आहे.