मुंबई- दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली स्थळ पाहणी. मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्व विचारात घेऊन येथे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याअंतर्गत दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत होण्याच्या दृष्टीने नरिमन पॉईंट- कफ परेड जोड रस्ता प्रस्तावित आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज यासाठीची स्थळ पाहणी केली.
मुंबईत वाहनांची वाढणारी संख्या आणि विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रस्ते वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. मंत्री आदित्य ठाकरे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली स्थळ पाहणी. दक्षिण मुंबईतील कफ परेड, कुलाबा परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता सध्या नरिमन पॉईंट तसेच मंत्रालय परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. याबाबत उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीए मार्फत नरिमन पॉईंट-कफ परेड जोडरस्ता प्रस्तावित आहे. या जोड रस्त्यासाठी विविध पर्यायी जागांची आज श्री ठाकरे यांनी नरिमन पॉईंट, बधवार पार्क, मच्छीमार सोसायटी, कफ परेड, कुलाबा परिसरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास उपस्थित होते.