भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्या – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे शासनाच्या वतीने करावयाच्या सोयी – सुविधांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. बैठकीला मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर,सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंग, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे- पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मार्गदर्शक भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे, रवि गरूड, महेंद्र साळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, “चैत्यभूमी हे पवित्र ठिकाण आहे. चैत्यभूमीवर कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा. अनुयायांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे,मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य पूर्वतयारी करावी. चैत्यभूमी येथील स्तूप मोठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने लवकरात लवकर कार्यवाही करावी. तसेच या परिसराच्या सुशोभिकरणासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना व महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या सूचना लक्षात घेवून काम करा. रेल्वेने येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनानेही सहकार्य करावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असून चैत्यभूमी परिसरात भारताचा राष्ट्रध्वज उभारावा. चैत्यभूमी परिसरात गर्दी टाळण्यासाठी या परिसरातील जास्त जागा प्रशासनाने या कालावधीत आपल्या अखत्यारित घ्यावी. याची अंमलबजावणी काटेकारपणे करावी”, अशा सूचना यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी केल्या.

चैत्यभूमी येथे सर्व सुविधा प्राधान्याने देणार : पालकमंत्री दीपक केसरकर

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, “चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयांयाना अभिवादन करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये याची खबरदारी घेण्यात येईल. महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या सूचनांबाबत मुख्यमंत्री महोदयांना माहिती देवून निर्णय घेण्यात येतील. सध्या स्थानिक प्रशासनाचा उत्तम समन्वय आहे. अनुयायांसाठी वॉटर प्रूफ मंडपाची उभारणी, वैद्यकीय सुविधा तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. येथे प्रशासन व नागरिकांनी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी महापरिनर्वाण दिनानिमित्त प्रशासनाने करावयाच्या कामाबाबत विविध सूचना बैठकीत केल्या.

प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केले. प्रत्येक प्रशासकीय विभागांनी यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सेवा – सुविधांबाबत माहिती दिली.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech