भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून आरोग्य सुविधा द्या

0

भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून आरोग्य सुविधा द्या- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा. “भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून तत्काळ नागरिकांना आरोग्य सुविधा मुंबई महापालिकेने द्याव्यात”, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

भांडूप पश्चिम येथील के.ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार रमेश कोरगावकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, “भांडूप पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून या परिसरातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून येथील नागरिकांना दिलासा मिळेल. ड्रीम्स सोसायटी येथे रेल्वे ट्रॅकच्या आवाजाची तीव्रता कमी होण्यासाठी मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी तातडीने कार्यवाही करावी. मार्शल एस.आर.ए.सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकल्पामध्ये २००० पूर्वीच्या खोट्या पावत्यांबाबत चौकशी करून ६० दिवसाच्या आत अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शासनाच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याची कार्यवाही करावी, बेकायदेशीर पार्कींग, अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी. काही संस्था देशाविरोधी कारवाई करत असल्याच्या तक्रारी पाहता पोलीस प्रशासनाने याची चौकशी करून तातडीने याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.लोढा यांनी बैठकीत दिले.

नागरिकांनी विविध २२५ विषयांसंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले. यामधील ८० अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर उपस्थित राहून प्रत्यक्ष समस्या मांडल्या. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech