अवघ्या दीड महिन्यात २८ हजार कनेक्शन दिली

0

मुंबई- अवघ्या दीड महिन्यात २८ हजार कनेक्शन दिली. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने नियोजनपूर्वक गतिमान कारवाई केली असून केवळ दीड महिन्यात २७,९८० नवी कनेक्शन दिली आहेत. शेतकऱ्यांच्या ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण वेगाने प्रयत्न करत आहे, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. त्याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार महावितरणने विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली.

महावितरणने ३१ मार्च २०२२ अखेर कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी प्रलंबित १,८०,१०६ अर्जांपैकी ८२,५८४ कनेक्शन एप्रिल २०२२ ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत दिली आहेत. यापैकी २७,९८० जोडण्या या नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचे पंधरा दिवस या पंचेचाळीस दिवस एवढ्या कमी कालावधीत दिल्या आहेत.

महावितरणचे याबाबत केलेले नियोजन पूर्ण झाले असून अंमलबजावणीची गती वाढल्यामुळे नवीन कृषी पंप कनेक्शन देण्याचा वेग वाढला आहे. महावितरण या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ मार्च २०२३ पर्यंत आणखी १ लाख कृषी पंप जोडण्या देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कृषी पंपासाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज नव्याने दाखल होत आहेत. पण त्याचवेळी महावितरण पेड पेंडिंगचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना प्राधान्याने नवी कनेक्शन देत आहे. परिणामी राज्यातील कृषी पंपांसाठी वीज जोडणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech