मी राष्ट्रवादीतच, कुठेही जात नाही, विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम !

0

अजित पवारांचा राजकीय भूकंपावर पूर्णविराम

मुंबई दि. १७ एप्रिल – माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत त्यामुळे या बातम्यांना कुठलाही आधार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. त्यामुळे गेले काही दिवस माध्यमातून येत असलेल्या उलटसुलट बातम्यांवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर राजकीय भूकंपाला पूर्णविराम दिला.

अजित पवार म्हणाले की, वेगवेगळ्या चॅनेलवर इतर राजकीय पक्षाचे नेते आपली मते व्यक्त करत आहेत त्यांनी ते काय व्यक्त करावे तो त्यांचा अधिकार आहे मात्र मंगळवार, बुधवार आमदारांच्या बैठका असतात. आमचे अनेक आमदार मंत्र्यांकडे किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतात. आज जे आमदार आले होते ते माझ्याकडे मी इथे आहे म्हणून भेटायला आले होते. ती नेहमीची पध्दत आहे यामध्ये वेगळा अर्थ काढू नका. त्यामुळे हे जे आमदार भेटले तुम्ही दाखवत आहात. त्याच्यातून त्यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो आमच्या पक्षाचा कणा आहे तोही संभ्रमावस्थेत जातो त्या सगळ्यांना सांगायचे आहे बाबांनो, काही काळजी करू नका आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना झालेली आहे. पक्षात अनेक चढउतार आले. राजकारणात सत्ता होती, कधी सत्ता नव्हती परंतु ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

आज महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, अवकाळी पाऊस असे अनेक प्रश्न आहेत त्यावरुन लक्ष वळवले जात आहे. ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार होती ती भरती अजून होत नाहीय. कापूस, कांदा शेतकरी हैराण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला त्यांचे त्यांनी काम केले. त्यांचे ते कर्तव्य होते परंतु दौरा केल्यानंतर तातडीची मदत केली पाहिजे होती ती मदत होताना दिसली नाही. बारदाने नाहीत म्हणून खरेदी केंद्रांचे काम बंद पडले हे काय उत्तर झाले का? असा संतप्त सवाल करतानाच बारदाने गोळा करण्याचे किंवा उपलब्ध करून देण्याचे काम सरकारचे आहे. याकडे लक्ष द्यायला हवे त्याकडे लक्ष नाही असे खडेबोलही अजित पवार यांनी सरकारला सुनावले. दोन्ही (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) माध्यमांना विनंती, या कुठल्याही गोष्टींमध्ये तथ्य नाही. नुसते अंदाज व्यक्त करत आहात. कोण अंदाज व्यक्त करते आहे माहीत नाही. तुम्हाला प्रतिज्ञापत्र करुन देऊ का? असेही अजित पवार यांनी पत्रकारांना सुनावले.

दुसरं एक ट्वीट दाखवायला सुरुवात केली. अजित पवार यांच्या ट्वीटरवरुन पक्षाचे चिन्ह हलवले माझ्या ट्वीटमध्ये उपमुख्यमंत्री असताना दाखवलं ते उपमुख्यमंत्री पद गेल्यावर काढले बाकीचे आहे तसे आहे. त्यातून गैरसमज करुन घेतला गेला. तुम्हीच म्हणता झेंडा काढला… ‘झेंडा काय कपाळावर लावून फिरू का?’ ‘अरे बाबांनो…’ध’ चा ‘मा’ करु नका ना… जर काही झाले तर मीच सांगेन ना तुम्हाला… दुसर्‍या कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडून बातम्याही काढायची गरज नाही. आमच्या मनात असा कुठलाही विचार नाही, चर्चाही नाही. कुणीतरी बातम्या पेरण्याचे काम विघ्नसंतोषी लोक करत असतील मी माझ्या पक्षाचे म्हणत नाही. माझ्याबद्दल आकस असणारे माझ्या पक्षात कुणी नाही पक्षाबाहेरचे आहेत असेही अजित पवार म्हणाले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech