पुणे : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या गृह कर्ज व चारचाकी वाहन कर्ज ग्राहकांसाठी डिजिटल कर्जाचा मंच विमोचीत केला. त्यामुळे संभाव्य रिटेल कर्ज ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी व सोईस्कर वेळेत कागदपत्र विरहित प्रक्रियेचा अवलंब करून डिजिटल माध्यमाद्वारे कर्जाकरीता अर्ज करता येईल.
तसेच या डिजिटल कर्ज सुविधेमुळे सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीने भरल्यानंतर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाच्या शिवाय गृह व चारचाकी वाहन कर्जांना तत्वतः मान्यता प्रदान करण्यात येईल. सदर सुविधेद्वारे ग्राहकाचे केवायसी,सिबिल व वित्तीय तपशील पडताळून घेण्याची सोय सुद्धा आहे. www.bankofmaharashtra.in या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन संभाव्य ग्राहक उपरोक्त सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या एका समारंभात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी सदर डिजिटल सुविधेचे लोकार्पण केले. बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा व श्री ए बी विजयकुमार हे बँकेच्या सर्व सरव्यवस्थापक व ४० विभागीय व्यवस्थापक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासह दुर्दृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. . . .
सदर डिजिटल सुविधेचे लोकार्पण करताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी सांगितले की सदर डिजिटल सेवा लोकार्पण करताना ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय बँकिंगचा आनंद घेता यावा हे उद्दिष्ट आहे. आपली डिजिटल बँकिंग अधिक मजबूत व सुरळीत करण्यासाठी बँकेने अनेक पाउले उचलली असून अशा ग्राहककेंद्रित सुविधा पुरविण्यासाठी बँक नेहमीच पुढाकार घेईल.
सध्याच्या उत्सवी उत्साही वातावरणात ग्राहकांना खरेदीचा आनंद सुलभतेने घेता यावा म्हणून बँकेने गृह व चारचाकी वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले असून या कर्ज योजनांचे व्याजदर सुद्धा अतिशय आकर्षक ठेवण्यात आले आहेत.