अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल,प्रवीण कोया आणि सत्यजित मंडल यांनी घेतला कामांचा आढावा

0

मुंबई उपनगर: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल,प्रवीण कोया आणि सत्यजित मंडल यांनी घेतला कामांचा आढावा. अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याद्वारे करण्यात येत असलेली कार्यवाही समाधानकारक असल्याचे मत केंद्रीय निवडणूक निरीक्षक तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेश‌ देवल यांनी व्यक्त केले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक समन्वय अधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय निवडणूक निरीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी प्रवीण कोया आणि भारतीय राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी सत्यजित मंडल उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या विविध स्तरीय कार्यवाहींची माहिती या बैठकीदरम्यान निवडणूक निरीक्षकांना दिली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अजित साखरे आणि निवडणूक विषयक कार्यदायित्वे सोपविण्यात आलेले समन्वय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वतीने निवडणूक निरीक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी ‘अंधेरी पूर्व’ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती मान्यवर निवडणूक निरीक्षकांना दिली. यामध्ये प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था, अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांच्या विषयीची संक्षिप्त माहिती, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबतची माहिती, प्रसिद्धी व प्रचार विषयक बाबी, निवडणूक कर्तव्य सोपविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणांचा तपशील आदी माहितीचा समावेश होता.

बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यदायित्वाची आणि करण्यात आलेल्या कामांची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली. तसेच याबाबत निवडणूक निरीक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी समाधानकारक उत्तरे देत माहिती दिली.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘१६६ – अंधेरी पूर्व विधानसभा’ मतदार संघाची पोटनिवडणूक असून या निवडणुकीत मतदान करण्याबाबत राबविण्यात येत असलेल्या जनजागृती कार्यक्रमांची माहिती देखील निवडणूक निरीक्षकांनी आवर्जून घेतली व त्याबाबत देखील समाधान व्यक्त केले.

या बैठकीच्या अखेरीस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मान्यवर केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचे आभार मानले. तसेच या निमित्ताने त्यांनी अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांना येत्या दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या निवडणुकीदरम्यान मतदान अवश्य करण्याचे व आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देखील पुन्हा एकदा केले आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech