मुंबई: मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत ‘साप्रवि’ची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार. मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन इमारतीच्या ६, ८, ९, १२ व १९ या मजल्यांवर कार्यरत असलेली सामान्य प्रशासन विभागाची कार्यालये याच इमारतीतील १९ व्या मजल्यावर एकत्रित आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे सामान्यांना एकाच ठिकाणी ही कार्यासने उपलब्ध होणार असल्याने त्यांना विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.
नवीन प्रशासन भवन इमारतीमधील सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यातील जागेच्या नुतनीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर असलेल्या उर्जा विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाच्यास रोख शाखेस याच इमारतीतील बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजूकडील सामान्य प्रशासन विभागाची जागा देण्यात आली आहे.
१९ व्या मजल्यावरील पूर्व बाजूस असलेले प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीस (कृषि व पदुम विभाग) नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या सामान्य प्रशासन विभागाची व त्याच्या बाजूला असलेल्या कृषि व पदुम विभागाच्या गोदामाची जागा वाटप करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागास बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजू व नवव्या मजल्यावरील पूर्व बाजूच्या जागेच्या बदल्यात १९ व्या मजल्यावर पश्चिम बाजूस उर्जा विभाग व राज्य निवडणूक आयोगाची (रोखशाखा) पूर्व बाजूची प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीची (कृषि व पदुम विभाग) जागा देण्यात आली आहे.