मुंबई:- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रदुषकांमुळे मृत्यू झाले नसल्याचा अहवाल प्राप्त. चंद्रपूर येथील विद्युत केंद्राच्या प्रदुषणाचा परिणाम नागपूरपर्यंत होत असल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबाबत संबंधित जिल्ह्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाला आहे, त्या अहवालात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि मर्क्युरी या हवेतील प्रदुषकांमुळे मृत्यू झाले नसल्याचे नमूद केले आहे, असे पर्यावरण व वातवरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले की, द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लिन एअर (सीआरईए) या खाजगी संस्थेने अभ्यास करुन चंद्रपूर येथील विद्युत केंद्राच्या प्रदुषणाचा परिणाम नागपूरपर्यंत होत असल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातमीमध्ये नमूद केलेल्या चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, नांदेड आणि पुणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता, त्या अहवालात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या हवेतील प्रदुषकांमुळे मृत्यू झालेले नसल्याचे नमूद केले आहे, असे सांगून चंद्रपूर विद्युत केंद्रात हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता ईएसपी आणि एएफजीसी यंत्रणा बसवली असल्याचेही राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रांतील प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न असून प्रदूषण मंडळ अथवा इतर विषयांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी पर्यावरणमंत्री, ऊर्जा मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेला नगरविकास विभागाकडून निधी मिळवून देण्यासाठी नगरविकासमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही श्री. बनसोडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.