राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

 

मुंबई: महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे. मात्र आपल्याला विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्वाचा आहे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह(शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार जयंत आजगावकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, संस्थेचे विजय वैद्य, प्रा.बी.आर.शर्मा हे उपस्थित होते.

यावेळी विज्ञान व उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सन २०२१ चा जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे आभारपर मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ कोल्हापूर व तालसंदे आकुर्डी पुणेचे कुलगुरू डॉ.संजय पाटील, नवी दिल्ली एआयसीटीई या संस्थेचे सदस्य डॉ.देविप्रसाद शर्मा, कोलकाता येथील एनटीटीआर या संस्थेचे संचालक प्रा.राजीव कुमार, कानपूर येथील एचव्हीटीयू विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ.ओमकार सिंग,म्हैसूर येथील व्हीजेटीआर येथील शास्त्रज्ञ डॉ.फारूक काझी यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी देशातील उत्कृष्ट कुलगरु तसेच इंजिनियरींग महाविद्यालयांच्या प्राचार्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या मेंबरशीप पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी आपल्याला निसर्गातून अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. आपल्याकडे तंत्रज्ञानातील अनेक विद्वान लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेवून आपण आपल्या राज्याला नक्कीच पुढे नेवूया. राज्यात नव्याने होणारे कला विद्यापीठ ही काळाची गरज आहे. आगामी काळातील कला विद्यापीठ राज्याच्या विकासात नक्कीच भर घालणारे आहे, असे मतही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जैव विविधतेचे जतन, संवर्धन आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या पिकांपासून आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. आपल्या देशातही ज्ञानवंत आहेत. त्यांनाही योग्य अशा गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागतील. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयएसटीईचे नेतृत्व कोल्हापुराकडे आहे. ज्या भूमीत छत्रपती शाहू महाराजांनी समानता, सक्षमतेचा आणि शिक्षणाचा पाया रचला, त्या भूमीकडे हे नेतृत्व आहे, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हत्तीशी संवाद साधणाऱ्या श्री.आनंद शिंदे दांम्पत्यांची कालच भेट झाल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपल्याला सृष्टीतील प्रत्येक गोष्टींशी संवाद साधता आला पाहिजे. श्री.शिंदे यांनी माहिती दिल्यानुसार हत्तींना त्सुनामीची चाहूल लागते आणि तीही दोनशे-अडीचशे किलोमीटर्सवर अंतरावर. त्यांच्याकडे कुठले तंत्रज्ञान आहे. हत्तीने पाय आपटला तर त्याच्या कंपनातून सात किलोमीटर्सवरील हत्तीला संदेश मिळतो. त्यामुळे आपण निसर्गाच्या पुढे पोहचलो, असे कसे म्हणायचे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात संगीत व कला विद्यापीठ :- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले,आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ लोकांना भेटता आले हे मी भाग्य समजतो. नव्याने अनेक तंत्रशिक्षण क्षेत्रातील संस्था उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रही उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण पावले उचलत आहे.राज्यात जे.जे.स्कूल ऑफ आर्ट कला विद्यापीठ म्हणून येत्या काही महिन्यातच नावारूपास येणार आहे.तसेच राज्यात शासकीय संगीत महाविद्यालय उभे राहत आहे ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.तसेच राज्यात राबविण्यात येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा पहिला भागही आगामी मंत्रीमंडळासमोर सादर होणार आहे असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

देशात आदर्शवत नवीन शैक्षणिक धोरण राज्य राबवेल :- राज्यमंत्री गृह(शहरे)सतेज पाटील

राज्यमंत्री गृह(शहरे) सतेज पाटील म्हणाले, देशातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली ही संस्था कार्यरत आहे. विशेषतः संस्थेचे अध्यक्ष प्रताप देसाई हे शिक्षणाचा दर्जा जपला जावा यासाठी अत्यंत चांगले काम करीत आहेत.शासनाबरोबर योग्यपणे समन्वय ठेवून शिक्षण क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.राज्यातही नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.देशात एक आदर्श असे हे नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राबवेल अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास

्ताविक अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी केले. प्रा.महेश काकडे यांनी सूत्रसंचालन तर आभार श्री.कटके यांनी मानले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech