मुंबई:- ग्राहकांकडे वीज बिलांपोटी असलेली थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी याचे प्रमाण कमी करणे हीच आपली त्रिसुत्री आहे, यासाठी आपण सर्वांनी काम करायचे असून आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी आज व्यक्त केले.
महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत आणि संचालक (वाणिज्य) श्री. सतिश चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री.विजय सिंघल पुढे म्हणाले की, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांचे विचार परिघापलीकडील होते, अभियंता देश घडवित असतो, राष्ट्रनिर्मिती करतो. त्याचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात, त्यांच्यात वेगळी क्षमता असते. जगात जे कुणी करु शकत नाही, ते अभियंता करु शकतो. अभियंता म्हणून आपल्यात असलेल्या पूर्ण क्षमतेने आपण काम करायला हवे, केवळ दैनंदिन काम नव्हेतर त्याचसोबत काही वेगळे काम करणे म्हणजे अभियंता होय. याशिवाय आपल्याला कामाचे समाधान मिळविता येणार नाही. महावितरण ही माझी स्वत:ची कंपनी आहे, म्हणून सतत कार्यरत रहाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आज महावितरणपुढे अनेक समस्या आहेत. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. यात अनेक अडचणी आल्यात आणि काम करणा-या माणसाला अडचणी येणारच हा विचार करुन आपले नेहमीचे कार्य करत रहा. आपल्या सेवांचा दर्जा वाढवायला हवा, ग्राहक राजा आहे, असे समजून स्वत:साठी व कंपनीसाठी आपल्याला काम करायचे आहे, असे आवाहन श्री. विजय सिंघल यांनी केले.
या कार्यक्रमाला महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.