जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

0

 

मुंबई : जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन. काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहे, हे देखील श्री.ठाकरे यांनी स्पष्ट केले.

· मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला गोविंदा पथकांचा सकारात्मक प्रतिसाद.

आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू अशी भावना व्यक्त केली.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आ. प्रताप सरनाईक, माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगांवकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, बाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, दहिहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी, गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

पहिल्यांदा आरोग्याचा विचार

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, सणवार, उत्सवाबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्न समोर येतो तेव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो. मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत, पण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.

जगभराचा अनुभव कटू

सगळे जग या विषाणूने त्रासलेले आहे. गेल्या दोन लाटेत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबच्या कुटुंब अनाथ झाली, त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटेतला आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाही तर जगाचा अनुभवही कटु आहे. दोन डोस दिलेल्या देशातही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशात पुन्हा निर्बंध लावले जात आहेत.

अजूनही काळजी घेण्याची गरज

नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लागणाऱ्या आयसीयु बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे. हा विषाणू घातक आहे. अजून आपल्याकडे ठोस औषध उपलब्ध नाही पण कोरोनाला रोखण्याचा मार्ग आपल्याला कळला आहे. आपल्याकडेही काही जिल्ह्यात दुसरी लाट जोरात आहे. काही ठिकाणी संसर्ग कमी झालेला दिसत असला तरी आपल्यासाठी हा “विंडो पिरियड” आहे. ज्याचा उपयोग आपल्याला आपले अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठी आणि तळहातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी करावयाचा आहे.

तर नाईलाजाने…

आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरानाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपण आपली आरोग्य व्यवस्था सक्षम करत आहोत, आपण एकाच दिवशी ११ लाख लोकांचे लसीकरण करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. आपण ऑक्स‍िजन, आय.सी.यु बेडची संख्या वाढवत आहोत. पण आपली ऑक्स‍िजन निर्मिती ही रोज १२०० ते १३०० मे.टन इतकीच मर्यादित आहेत. इतर रुग्णांना लागणारी ऑक्स‍िजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्स‍िजनची मागणी ७५० मे.टनच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सहकार्य कायम ठेवा- अजित पवार

महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, डेल्टा प्लस विषाणू घातक आणि वेगाने पसरणारा आहे, हे सगळे सांगितले जात असतांना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणाने, घरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही द्यावे असे आवाहन केले. संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल हेही श्री.पवार यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबर अर्थचक्र सुरळित ठेवण्याला प्राधान्य

अर्थचक्र सुरु राहण्यासाठी काही निर्बंधांमध्ये सुट देण्यात आली असून शासनाचे पहिले प्राधान्य हे आजही लोकांची सुरक्षितता आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याला असल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पुढच्या काळातही सावधगिरीने पुढे जाण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

अधिकारी आणि मान्यवरांची मते

या उत्सवात मोठ्या प्रमाणात तरूणवर्ग सहभागी होतो जो ३५ च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नसल्याचे आयुक्त चहल यांनी यावेळी सांगितले. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्युट फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटने तसेच नीती आयोगाने दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याची माहिती दिली. बहृन्मुंबई पोलीस आयुक्त श्री. नगराळे यांनी आयुक्तांच्या सूचनेला दुजोरा दिला. कोरोनाकाळात गणेशोत्सवासह सर्व सण साधेपणाने साजरे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डॉ. संजय ओक यांनी दहिहंडीचा उत्सव हा अतिशय जवळून, एकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणारा सण आहे, या खेळात मानवी थर रचले जात असतांना एकमेकांना जवळून स्पर्श होतो, थर लावतांना अंगावर पाणी टाकले जाते, पावसाळा सुरु आहे, पाण्याने मास्क भिजला तर मास्कची सुरक्षितता संपूर्ण संपुष्टात येते हे सांगतांना ‘डेल्टा प्लस’ हा विषाणू घातक असून तो वेगाने पसरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. दहिहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आजही आपण आपले आप्तस्वकीय गमावत असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि हा सण आपण रक्तदान, औषधे आणि कोरोना प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करून साजरा करू, आपल्या उत्सवाचे “स्पीरीट” वेगळ्या पद्धतीने जपू असे आवाहन केले.

डॉ. पंडित यांनी हा सण आपला आवडता असला तरी कोरोनामुळे तो आपल्या साजरा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले विविध देशात ज्यांच्या नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत तेथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने घेतलेल्या भयानक स्थितीची त्यांनी माहिती दिली.

हा उत्सव गर्दीत आणि अतिशय जवळून मानवी संपर्कातून साजरा होतो जो कोरोना संसर्ग वाढवण्याला कारणीभूत ठरू शकतो असे सांगून डॉ. जोशी म्हणाले की, आता कुठे आपण दुसरी लाट काही ठिकाणी नियंत्रणात आणू शकलो आहोत, अर्थचक्र सुरु करण्यासाठी काही निर्बंध शिथील करू शकलो आहोत, त्यामुळे आपल्याला संसर्ग वाढवून चालणार नाही. डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई यांनी देखील यावेळी आपली भूमिका विशद केली.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech