मुंबई: प्लास्टिक कारखान्यात ३० लाखांची वीजचोरी उघड पुणे जिल्ह्यातील प्रकार; महावितरणच्या भरारी पथकाची कामगिरी. वीजमीटरसह वीजयंत्रणेत फेरफार करून खेड तालुक्यातील (जि. पुणे) मेसर्स ए. टी. प्लास्टिक कारखान्यामध्ये गेल्या १८ महिन्यांपासून सुरु असलेली २९ लाख ७६ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे. वीजचोरी व दंडाच्या एकूण ५२ लाख ९६ हजार रुपयांच्या वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे या कारखान्याच्या मालकाविरुद्ध बुधवारी (दि. २८) चाकण पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, महाळुंगे (ता. खेड, जि. पुणे) येथे मेसर्स ए. टी. प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात प्लास्टिकच्या वस्तुंची निर्मिती केली जाते. या कारखान्यासाठी ग्राहकाच्या मागणीनुसार महावितरणकडून १०० अश्वशक्ती क्षमतेची उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र या कारखान्यातील वीजवापराबाबत महावितरणच्या अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या विश्लेषणातून संशय निर्माण झाला होता. त्यानुसार महावितरणच्या पुणे ग्रामीण भरारी पथकाने या कारखान्यातील वीजमीटर व संचाची तपासणी केली. यात कारखान्यामध्ये तब्बल 232 अश्वशक्ती जोडभाराचा अनधिकृत वीजवापर तसेच वीजमीटरमध्ये फेरफार आढळून आला. गेल्या 18 महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकारामध्ये १ लाख ८५ हजार ११ युनिटची म्हणजे २९ लाख ७६ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले.
वीजचोरी प्रकरणी महावितरणकडून वीजचोरीच्या दंडाचे २३ लाख २० हजार रुपये आणि वीजचोरीचे २९ लाख ७६ हजार रुपयांचे बिल सदर कारखान्यास देण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम भरली नसल्याने बुधवारी (दि. २८) या कारखान्याच्या मालकाविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ पाटील, सहायक अभियंता संजय जाधव, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे, तंत्रज्ञ महेश दरेकर यांनी ही कामगिरी केली.