मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत. कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 25 हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला.
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे.
ज्या गावांना एमआय़डीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
एमआयडीसीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयातून ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून 1000 राशनची पाकिटे( 25 हजार किलो), 2000 पाण्याच्या बाटल्या, 5500 बँकेट्स, 5500 टॉवेल्स पाठविण्यात आले तर औरंगाबादमधून 500 अन्नधान्याची पाकिटे पाठविण्यात आली.
कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे 25 हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीने मदत दिली जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याची भावना श्री. देसाई यांनी व्यक्त केली.